Murder In Sangali, सासरच्या मंडळींनी मार-मार मारलं; उपचार सुरू असताना जावयाने सोडले प्राण – a 32 year old man died in hospital after being beaten up by his relatives
सांगली : सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इस्लामपूरच्या बोरगाव या ठिकाणी घडली आहे. विजय जाधव असं मृत जावयाचं नाव आहे. पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणातून विजय जाधव यांना सासरच्या लोकांनी जबर मारहाण केली होती. यामध्ये जखमी झालेल्या जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सासू ,सासरे आणि मेहुण्याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूर जवळच्या बोरगाव या ठिकाणी विजय जाधव हे वास्तव्यास होते. त्यांची सासुरवाडी घराशेजारीच आहे. कौटुंबिक कारणातून विजय जाधव व त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी वादावादी होत असत. ३० जुलै रोजी देखील विजय जाधव आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झालं. त्यातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नीला आणण्यासाठी विजय जाधव हे घराशेजारीच असणाऱ्या सासुरवाडीत गेले. त्यावेळी सासू राजश्री कवठेकर, सासरे मधुकर कवठेकर आणि मेहुणा प्रशांत कवठेकर यांचा विजय जाधवांसोबत वाद झाला. सांगलीतील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट: १५ संशयित ताब्यात; गूढ उकलणार?
या वादावेळी तू आमच्या मुलीला सतत त्रास देतो, असं म्हणत कवठेकर कुटुंबातील व्यक्तींनी विजय जाधव यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यातून तिघांनीही विजय जाधव यांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जखमी जाधव यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी उपचार सुरू असताना विजय जाधव यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी विजय जाधव यांची आई कलाबाई जाधव यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये मुलाचे सासरे मधुकर कवठेकर, सासू राजश्री कवठेकर आणि मेहुणा प्रशांत कवठेकर या तिघांविरोधात तक्रार दिली असून अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.