मृतक निर्मला यांची मुलगी उर्मिला चंद्रकांत आत्राम आणि तिचा प्रियकर रुपेश येनगंधलवार या दोघांनी मिळून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पुढील कारवाई अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
उर्मिला हिचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून उर्मिला हिचे पालन पोषण आईनेच केले. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती. मात्र, आईच्या हत्येनंतर ती आणि तिचे प्रियकर संशयाच्या भोवऱ्यात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला आत्राम आणि रुपेश येनगंधलवार या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रात्रीच्या सुमारास या दोघांनी मिळून हे कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या याबाबत अधिकृत माहिती नसली तरी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अहेरी पोलीस घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा करीत असून शवविच्छेदन अहवाल आल्यावरच अधिकृत माहिती मिळणार आहे.