दलित कुटुंबातील ९ वर्षांच्या इंद्र कुमारला २० जुलैला मारहाण झाली. सुराणा गावात हा प्रकार घडला. या प्रकरणी जालोरच्या सामाजिक न्याय विभागाचे सहायक संचालक सुभाष चंद्र मणी यांनी इंद्र कुमारचे वडील देवाराम आणि त्याचे काका यांच्याशी संवाद साधून एक अहवाल तयार केला आहे. त्यांनी हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठवला आहे.
२० जुलैला सकाळी ७ वाजता इंद्र कुमार शाळेत गेला. १०.३० ते ११ दरम्यान मधल्या सुट्टीत तो शिक्षक आणि शाळेचे मालक चैल सिंह यांच्यासाठी असलेल्या माठातून पाणी पित होता. यावेळी सिंह यांनी इंद्र कुमारला पाहिलं. त्यांनी त्याला मारहाण केली. इंद्रच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला. तो तिथेच कोसळला. शाळा सुटल्यावर इंद्र त्याच्या वडिलांच्या पंक्चर दुकानात गेला. त्यानं घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. कान जास्त दुखत असल्यानं कुटुंबानं मेडिकल दुकानातून औषधं आणली. मात्र वेदना कमी झाल्या नाहीत.
कुटुंबातील सदस्यांनी इंद्र कुमारला जालोरपासून १३ किमीवर असलेल्या बगोडा येथील रुग्णालयात नेलं. वेदना कमी झाल्यावर त्याला घरी आणलं. मात्र एक-दोन दिवसांत त्रास पुन्हा वाढला. इंद्रला घरापासून ५० किमीवर असलेल्या आस्था मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी वेदना कमी झाल्यानं त्याला डिस्चार्ज मिळाला. पुढल्या दिवशी वेदना पुन्हा वाढल्या. इंद्र कुमारला भिनमल येथील त्रिवेणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे २ दिवस त्याच्यावर उपचार झाले.
दुसऱ्या दिवशी त्रास आणखी वाढला. इंद्र कुमारला घरापासून १५५ किमीवर असलेल्या दिसामध्ये दाखल करण्यात आलं. गुजरातमध्ये असलेल्या दिसा येथील कर्णी रुग्णालयात इंद्र कुमारवर उपचार झाले. २४ तासांनंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. कुटुंब पुन्हा राजस्थानला परतलं. इंद्र कुमारला पुन्हा त्रास झाल्यानं त्याला पुन्हा गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आसं. १३ ऑगस्टला दुपारी साडे अकरा वाजता त्यानं निधन झालं.