महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे. तसेच या खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या शिवसैनिक नारायण भोईर यांना लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी, यासाठी गोविंदा पथकाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अहमदनगर महामार्गाची कल्याणजवळील म्हारळ ते कांबा या दरम्यान अक्षरश: चाळण झाली आहे. दूध फळभाज्या यांच्यासह प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला हा रस्ता वर्षांतून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ खड्डेमय असतो.
खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा इशारा
म्हारळ पाडा ते पाचवामैल हे अंतर जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतराचे असेल. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी अर्धा तास लागतो आणि संध्याकाळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वारंवार स्थानिक रहिवाशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या या महामार्गावरील कांबा गावातील शिव नवतरूण गोविंदा पथकाने आज या महामार्गाच्या खड्ड्यामध्ये चार थराचा मानवी मनोरा उभा केला.
तसेच खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या नारायण भोईर यांना लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी व महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशा प्रकारचे पोस्टर हातात घेऊन सलामी दिली. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही या गोविंदा पथकाने दिला आहे.