कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. खासदार राऊत आणि आमदार साळवी यांच्यात याच मुद्दयावरून सुप्त संघर्ष आहे. त्याचमुळे आमदार राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या शक्यता व्यक्त जात होत्या. त्यावर अधिक स्पष्टपणाने भूमिका मांडताना राजन साळवी म्हणाले, “माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहे. माझी निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी आहेत. त्यामुळे मी पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत आहे. आदित्य ठाकरेंसोबत महाराष्ट्रात फिरतोय, मी कोणत्याच गटा-तटात जाणार नाही. मरेपर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही”
“सर्वसामान्य शिवसैनिकाला एवढं सारं दिल्यानंतर त्याचा आणखी काय हवंय….. उद्धव ठाकरेंनी मला उपनेता केलं. उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर संघटनेसाठी काम करणं, संघटना बळकट करणं, पक्षाच्या बांधणीसाठी फिरणं, ही माझी जबाबदारी आहे. हीच जबाबदारी ओळखून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी आदित्य ठाकरेंबरोबर कोकण दौऱ्यात फिरतो. पश्चिम महाराष्ट्रातही त्यांच्यासोबत होतो. भविष्यातही मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे” असं राजन साळवींनी स्पष्ट केलं.
कोण आहेत राजन साळवी?
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी राजन साळवी हे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहेत. साळवी यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव करून ते निवडून आले होते. राजन साळवी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसंच शिवसेना जिल्हाप्रमुखपदावरही काम केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असले तरी राजन साळवी यांनी मंत्रिमंडळात काम करण्यासाठी एकदाही संधी मिळालेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. मात्र निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांच्यामुळे साळवी यांचे मंत्रिपद हुकले होते.