महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेला दहीहंडी सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज बावधनला दहीहंडी महोत्सवाकरिता अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी उपस्थितांच्या आग्रहाखातर त्यांनी गाणं म्हटलं तसेच उपस्थित गोविंदांना दहीहंडीच्या खास अंदाजात शुभेच्छाही दिल्या. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना रोखठोक उत्तर दिली.
फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार का? या प्रश्नावर अमृता म्हणाल्या, “देवेंद्र यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मतदारसंघही नागपूर आहे. पण आता ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. पुणे माझं आजोळ आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते, वेळ मिळते, तेव्हा मी पुण्याला येते. देवेंद्र सध्या नागपूरचे पालकमंत्री आहे. त्यामुळे ते नागपूर आणि पुण्याचे पालकमंत्री झाले तर मला नक्की बघायला आवडेल”
देवेंद्र पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील का? या प्रश्नावरही अमृता यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “देवेंद्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. मला महाराष्ट्र राज्य आवडते. आणि मला इथेच राहायचं आहे, म्हणून त्यांना महाराष्ट्रातच बघायला आवडेल, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जाऊ नये, असंच अमृता यांनी सुचवलं.
फडणवीस पुण्याचे पालकमंत्री, चंद्रकांतदादांनी गुपित फोडलं
पंधरा दिवसांपूर्वी, मंत्रिमंडळाचा विस्तार आटपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील पुण्याकडे रवाना झाले. शिरुरला जाऊन त्यांनी माजी आमदार, ज्येष्ठ भाजप नेते ज्याचं चार दिवसांपूर्वी निधन झालं त्या बाबुराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर ते बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहोचले. दिवसभरातील दगदगीमुळे त्यांचं नीटसं जेवण झालं नव्हतं. बाळासाहेब चव्हाण यांच्या घरी त्यांनी फक्कड जेवणावर ताव मारला. चव्हाण कुटुंबियांचा निरोप घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना शिक्रापूरच्या ग्रामस्थांनी गराडा घातला.
सगळ्या राज्यात फेमस असलेल्या बावळेवाडीच्या शाळेचा विषय तेथील ग्रामस्थांना उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घालायचा होता. तेथील एक पुढारी हाच विषय फडणवीसांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात चंद्रकांत पाटील त्यांना म्हणाले, “तुम्हीच व्हा आता पुढे व्हा अन् बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी…”
चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा रोख तेथील अनेकांच्या लक्षात आला. ज्यांना चंद्रकांत पाटील यांना इशारा कळला, त्यांनी दादांकडे स्मितहास्य करुन पाहिलं. दादांनीही चेहऱ्यावर हसू आणत, होय… होय… फडणवीसच पुण्याचे पालकमंत्री असतील असं म्हणत आपल्या स्वत:च्याच बोलण्याला एकप्रकारे दुजोरा दिला.