मुंबई : बोरिवली पश्चिमेतील गीतांजली ही चार मजली जुनी धोकादायक इमारत शुक्रवारी दुपारी १२.३०च्या सुमारास कोसळली. मुंबई महापालिकेने ही इमारत यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली होती. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वीच बहुतांश कुटुंबांनी घरे रिकामी केली होती. उर्वरीत तीन कुटुंबे शुक्रवारी सकाळी १० वाजताच इमारतीबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगर येथे ‘गीतांजली’ ही चार मजली जुनी इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती. त्या इमारतीतील तीन कुटुंबे वगळता अन्य कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता. या तीन कुटुंबांनी न्यायालयीन दावे केले होते. त्यांचा अपवाद वगळता इतरांनी इतरत्र आसरा घेतला होता. गीतांजली इमारतीची जर्जर अवस्था झाल्याने परिसरात नेहमीच चिंता व्यक्त केली जात होती. अखेरीस शुक्रवारी सकाळी तिन्ही कुटुंबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तातडीने घरे रिकामी केली. त्यानंतर अवघ्या दोन ते अडीच तासांच्या कालावधीत इमारत कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुठे, किती वाजता लोकल रद्द?

गीतांजली इमारत संकुलात एकूण चार इमारती असून, पालिकेने त्यापैकी ए विंग धोकादायक जाहीर केली होती. ही इमारत कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने संकुलातील अन्य तीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरत्या स्तरावर पालिका शाळेत स्थलांतरित केले आहे. त्यात सुमारे ७५ कुटुंबांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांसह बोरिवली पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. यामध्ये अग्निशमन दलाचे आठ फायर इंजिन, तीन रुग्णवाहिका, दोन रेस्क्यू व्हॅनचा समावेश होता. इमारत कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत इमारतीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू होते. गीतांजली इमारत कोसळत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here