जिल्ह्यात जुलैपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही. जूनमध्ये दोन रुग्ण आढळले होते. जुलैत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली होती. ऑगस्टच्या १८ दिवसांतच स्वाइन फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत असून, बाधितांचा आकडा हा ६४वर पोहचला आहे. राजीव नगरमधील ६५ वर्षीय पुरुषाचा स्वाइन फ्लूने बळी गेल्याची नोंद गुरुवारी झाली. पाठोपाठ सिडकोतील राणेनगरमधील एका ५७ वर्षीय महिलेचाही स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा तीनवर पोहचला आहे. स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्यासह बळींचाही आकडा वाढल्याने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्षणे फ्लूसारखीच
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्वसाधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधीकधी पोटदुखी आदी लक्षणांचा समावेश आहे.
– ही घ्या काळजी
– वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवा
– पौष्टिक आहार घ्या
– लक्षणे असल्यास गर्दीत जाणे टाळा
– धूम्रपान टाळा
– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका