मुंबई : बेघर, भिक्षेकरी तसेच किरकोळ गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींना जिथे ठेवले जाते ती बालसुधारगृहेही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. दादर येथील डेव्हिड ससून बालसुधारगृहात चार मुलांनी केलेल्या मारहाणीत १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. वैद्यकीय अहवालात मारहाण झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली आहे.

गिरगाव चौपाटीवर ६ ऑगस्ट रोजी एक १६ वर्षांचा मुलगा एकटाच फिरताना दिसला. पोलिसांनी हटकल्यावर त्याला काहीच सांगता येत नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी त्याचे छायाचित्र तसेच इतर माहिती सर्व पोलिस ठाण्यांना दिली आणि त्याच्या पालकांचा शोध लागेपर्यंत बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार त्याला दादरच्या डेव्हिड ससून बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. बालसुधारगृहातील विलगीकरण कक्षात या मुलासह जवळपास २६ मुले होती. १६ ऑगस्ट रोजी हा मुलगा विलगीकरण कक्षात बेशुद्धावस्थेत आढळला. सुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी कक्षातील इतर मुलांना विचारले. मात्र कुणीच काही सांगत नव्हते. अखेर कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुठे, किती वाजता लोकल रद्द?

सोळा वर्षांच्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विलगीकरण कक्षातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा कक्षातील चार मुलांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालामध्येही मार लागल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. त्यानुसार बालसुधारगृहाच्या वतीने शिवाजी पार्क पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी चौघांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली.

दुर्गंधी आल्याने संतापले?

हत्या करण्यात आलेल्या मुलाची वागणूक गतिमंद मुलांसारखी होती. तो फार कमी बोलायचा. मारहाण झाली त्या दिवशी त्याने शौचालयात न जाता विलगीकरण कक्षातच नैसर्गिक विधी केला. त्या दुर्गंधीमुळे संतापलेल्या चौघांनी त्याला अमानुष मारहाण केल्याचा संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here