जळगाव : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. धरणगावातील प्रवेश मार्गावर लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा, धरणगाव, पारोळा येथील शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य यांच्या सभा होणार आहेत. ते आज धरणगावात ज्या मार्गाने जाणार आहेत त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर आणि उड्डाण पुलाजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमत्र्यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग, बॅनर न काढण्यासाठी आदेश? प्रकरण पोहोचलं कोर्टात
राजकीय द्वेषातून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.