मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली. तसंच शासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणात गोविंदांचा समावेश करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एक शंका उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘दहीहंडीतील गोविंदांना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा संबंध निवडणुकांशी जोडला आहे.

शिंदे सरकारकडून एकनाथ खडसे यांना मोठा धक्का; पत्नी मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ

‘राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा,’ असं म्हणत रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय का आहे वादात?

राज्यातील खेळाडूंना शासकीय तसंच निमशासकीय क्षेत्रात नोकरी देताना खेळाला महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असावी, तसंच स्पर्धेचे आयोजन राज्य ऑलिम्पिक संघटनेस संलग्न असलेल्या खेळाडूंच्या संघटनेने केलेलं असावं, असा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. या परिस्थितीत गोविंदांना खेळाडूंच्या संवर्ग आरक्षणातून नोकरी कशी मिळणार, हा प्रश्न कायम असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here