कल्पेश यांना जेव्हा जेव्हा ताण तणाव यायचा, त्या त्या वेळी ते घर सोडून जायचे, अशी माहिती कल्पेश मारू यांच्या जवळच्या नातेवाईकांना दिली. २००८ मध्ये ते घर सोडून गेले होते. त्यानंतर ते बऱ्याच दिवसांनी सापडले. त्याला न ओरडण्याचा सल्ला डॉक्टरांनी कुटुंबियांना दिला होता. मारू यांच्यावर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांचे वडील शांतीलाल आणि आऊ निर्मलाबेन यांना बरीच चिंता वाटत होती, असंही नातेवाईकांनी सांगितलं.
गेल्या ४ महिन्यांत कल्पेश यांच्या आयुष्यात बरेच बदल झाले होते, असं दुसऱ्या एका नातेवाईकानं सांगितलं. त्यानं धूम्रपान सोडलं होतं. तो स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यायला लागला होता. डॉक्टरांना तो नियमितपणे भेटत होता. १४ ऑगस्टला तो घरातून बाहेर पडला. त्याआधी त्यांनी वडील शांतीलाल यांचा वाढदिवस साजरा केला होता, अशी माहिती नातेवाईकानं दिली.
विरारमधील शिरफाटा परिसरात असलेल्या पेट्रोल पंपजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एका व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास आम्हाला मिळाली. आम्ही तिथे पोहोचलो आणि त्या व्यक्तीला जवळच असलेल्या गॅलेक्सी रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचं वरिष्ठ निरीक्षक प्रफुल वाघ यांनी सांगितलं. पोलिसांना कल्पेश यांच्या खिशात आधार कार्ड सापडलं. त्यावरून ओळख पटली. त्यानंतर विरार पोलिसांनी याची माहिती दादर पोलिसांना दिली.