गिरीश बापट यांनी शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. राजकीय पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा असते, अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर पेच निर्माण होऊ शकतो. त्यांचा रोख अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडे होता. या संघटनेने योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यावा. पण देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही. उलट फडणवीस पुण्यातून उभे राहिल्यास मला आनंदच होईल, असा गिरीश बापट यांनी म्हटले.
ब्राह्मण महासंघाने नेमकी काय मागणी केली?
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bhartiya Brahmin Mahasangh) आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.ही मागणी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे.पी. नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे भविष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एका महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांना एक पाऊल मागे यावे लागले असले तरी हा प्रारंभ आहे. भाजपचा हा निर्णय योग्य मानला जाऊ शकतो, असे या पत्रात म्हटले होते.