एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठं वादळ उठलं. ज्यांची ठाकरे कुटुंबाचे विश्वासू आणि ‘मातोश्री’चे निष्ठावंत म्हणून ओळख होती, त्यांनीच पक्षनेतृत्वाविरोधात भूमिका घेऊन भाजपशी सलगी करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचलं आणि नवं सरकार स्थापन केलं. एकएक करुन जवळपास ४० आमदारांनी आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. दरम्यानच्या काळात पक्षाला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे ताकदीने मैदानात उतरले, तर ऑगस्ट महिन्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाची सांगता होताच उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा श्रीगणेशा होणार आहे.
ज्या ठाण्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं, त्यांच्याच बालेकिल्ल्यातून म्हणजे ठाण्याच्या टेंभी नाक्याच्या मैदानात उद्धव ठाकरे पहिली सभा घेणार आहेत. या सभेत त्यांच्यासोबतीला शिवसेनेचे सगळे ज्येष्ठ नेते असतील तसेच पक्षात नव्याने एन्ट्री केलेले नेते देखील सामील होतील. आतापर्यंत पत्रकार परिषदा, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार-खासदारांवर तोफ डागली. आता थेट मैदानी सभांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवरुन उद्धव ठाकरे शिंदेंना ललकारणार आहेत.
महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची ‘महाप्रबोधन यात्रा’ जाणार आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना महाराष्ट्रासाठी कोणकोणती कामं केली, कोव्हिड काळात ठाकरे सरकारने कसं काम केलं इथपासून ते एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत उद्धव ठाकरे आपली बात जनतेसमोर ठेवतील, जनतेशी हितगूज करतील. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला राज्यभरात सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत असताना उद्धव ठाकरे यांनीही आता शड्डू ठोकला आहे. ठाण्यातून सुरुवात करुन उद्धव ठाकरे यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’ची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात होईल.