पुणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्ष राज्यभरात गणेशोत्सव साध्या पद्धतीने पार पडले. मात्र यंदा सणांवरील सर्व निर्बंध हटवण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर जगभरात नाव असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यातील गणेश मंडळांचे देखावे हे चर्चेचा विषय असतात. मात्र आता याच देखाव्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या संगम तरुण मंडळाने यावर्षी ‘अफझल खान वध’ हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण देत संगम तरुण मंडळाला हा देखावा साकारण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित जो काही इतिहास आहे तो दाखवण्यास काय भीती आहे? आपल्या हिंदुस्थानात महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का? असा संतप्त सवाल किशोर शिंदे यांनी विचारला आहे.

खरी शिवसेना कोणाची?, राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार?

दरम्यान, संगम तरुण मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. हे मंडळ ऐतिहासिक देखावे साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी अफझल खान वध हा जिवंत देखावा संगम तरुण मंडळाच्या वतीने साकारण्यात येणार होता. तशी रीतसर परवानगी मागण्याचे पत्र ११ ऑगस्ट रोजी मंडळाच्या वतीने पोलिसांना देण्यात आले होते. शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही हा उत्सव साजरा करू, अशी ग्वाही मंडळाच्या वतीने देण्यात आली होती. मात्र, यापूर्वी अशा देखाव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा देखाव्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं कारण देत अफझल खान वध हा जिवंत देखावा साकारण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे पत्र पोलिसांनी संगम तरुण मंडळाला दिलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेनंतर मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत. मात्र त्यापूर्वी हिंदुत्वाच्या नावावर सरकार बनवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की, ते आम्हाला परवानगी देतील, असं किशोर शिंदे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here