Maharashtra politics | शिवसेनेच्या १६ आमदारांची अपात्रता; तसेच खरी शिवसेना कोणाची यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. परिणामी एकनाथ शिंदे गट, शिवसेना आणि भाजपची धाकधूक वाढणार आहे. निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हायलाइट्स:
- या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती
- तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली
- निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सातत्याने लांबणीवर टाकली जात आहे. या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यादरम्यान शिंदे गट शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याबद्दलच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळवून घेतली होती. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगाने दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. ती मुदतही २३ ऑगस्टलाच संपत आहे.
याप्रकरणाची सुनावणी वारंवार लांबवणीर पडत असल्याने अनेक चर्चांना उधाण झाले आहे. निष्पक्ष न्यायाचा आग्रह धरणाऱ्या आणि परखड मतं व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांमध्ये संपत आहे. त्यानंतर यू.यू. लळीत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास निकाल लागण्यास खूपच विलंब लागू शकतो. याकाळात शिवसेनेची पूर्णपणे वाताहात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरी शिवसेना कोणाची?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ जुलैपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा विचार न्या. रमणा यांनी व्यक्त केला आहे; मात्र अजून घटनापीठाची स्थापना झालेली नाही. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास शिवसेनेसमोर मोठे संकट उभे राहू शकते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.