‘आशेचे कमळ कोमेजलेले नाही हे कृतीने दिसू द्या’
भाजप नेत्यांकडून भावना गवळी यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर नेते प्रताप सरनाईक, यशवंत जाधव आणि अन्य काही जणांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हेच नेते आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे ‘सामना’तून भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांची आणि पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारविरोधी अशी स्वत:च्या बनवलेल्या प्रतिमेची आठवण करून देण्यात आली आहे.’प्रामाणिकपणाची लाट या देशात कधीच आली नव्हती, पण वादळात काही आशेचे दिवे लुकलुकत होते. तेही विझताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींकडून २०१४ पासून अपेक्षा होत्या. आजही आशेचे कमळ कोमेजलेले नाही हे कृतीने दिसू द्या,’ असं आवाहनही रोखठोक सदरातून नरेंद्र मोदी यांना करण्यात आलं आहे.
‘बेकायदेशीर सरकार व दलबदलू आमदारांवर तत्काळ निकाल अपेक्षित होता’
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र यासंदर्भातील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्रातील खोकेबाज आमदारांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात आहे. खरे तर महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार व दलबदलू आमदारांवर तत्काळ निकाल अपेक्षित होता व निकाल लागताच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी दलबदलूंच्या राजकीय भ्रष्टाचारावर प्रहार करायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. भारतीय राजकारण व समाजजीवनात स्वच्छ राजकारणी म्हणून, एक श्रेष्ठ पुरुष म्हणून मोदींची प्रतिमा इतिहासात टिकावी असे वाटते, पण राजकीय विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा झाडू आणि भावनाताई, यशवंत दादांच्या तोंडी शुद्ध तुपातला लाडू असा एकंदरीत करेक्ट कार्यक्रम सुरू आहे,’ अशा शब्दांत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.