मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांचं काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सभागृहात याबाबत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

‘अवजड वाहनांच्या धडकेमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. अशा घटना टाळण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग आठ पदरी करण्याची गरज आहे. असं झाल्यास अवजड वाहनांसाठी दोन लेन राखीव ठेवता येतील,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. मात्र असा वाद न करता ज्या पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती आधी मिळेल त्यांनी आधी घटनास्थळी पोहोचावं. काही पोलीस अधिकारी टोलवाटोलवी करत असतात, त्यामुळे त्यांनाही कडक आदेश देण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात बोलताना केली आहे.

गाडी ओव्हरटेक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं, फोनवरची माहितीही चुकीची: फडणवीस

‘विनायक मेटेंच्या पत्नीचा फोन आला…’

‘दिवंगत विनायक मेटे यांच्या अपघाताबाबतची माहिती देण्यासाठी मला काल त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांचा फोन आला होता. या अपघातानंतर पोलिसांनी कर्तव्यात काही कसूर केला आहे का, याबाबत त्यांचे काही प्रश्न आहेत. मेटे यांचा कारचालक सतत जबाब बदलत असल्याच्या बातम्या येत आहेत. परिणामी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या मागणीवर फडणवीसांचं उत्तर

अजित पवार यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत केलेल्या सूचनांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘विरोधी पक्षनेत्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. सध्या मिसिंग लिंकचं काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास मदत होईल. तसंच चौथ्या लेनची जी सूचना करण्यात आली आहे ती प्रत्यक्षात आणता येईल का, याची पडताळणी करण्याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करेन,’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here