मुंबई : सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशीची झाली पाहिजे, जुनी फाईल पुन्हा ओपन करावी, अशी मागणी करुन भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजित पवार यांना टार्गेट केलं होतं. मोहित कंबोज यांच्या त्या ट्विटवरुन जवळपास चार दिवस राज्याचं राजकारण धुमसत राहिलं. त्या चर्चेवर कसाबसा पडदा पडतो ना पडतो तोच मोहित कंबोज यांनी आता पुन्हा नवं ट्विट केलं आहे. काकानंतर आता त्यांनी टार्गेट केलंय पुतण्याला….त्यांनी आता आपला मोर्चा वळवला आहे, रोहित पवार यांच्याकडे… रोहितबद्दल अभ्यास करत असल्याचा इशाराच कंबोज यांनी टि्वटमधून दिला आहे.

अधिवेशनाच्या आदल्या रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करुन राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही दिवसांसाठी दिशाच बदलून टाकली. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा करताना मोहित कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला. मोहित कंबोज यांनी अजित पवारांना टार्गेट केल्यानंतर रोहित पवार यांनी कंबोजांना रोखठोक उत्तर दिलं होतं. ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना…” असं म्हणत शालजोडीतून रोहित पवारांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला होता. रोहित पवार यांची प्रतिक्रिया कंबोज यांच्या जिव्हारी लागली होती. ज्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा रोहित यांच्याकडे वळवला आहे.

काकांना इशारा, पुतण्या रोहित पवारांची ‘दादा’ स्टाईल प्रतिक्रिया, कंबोज यांची कुंडलीच मांडली
“बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीसंदर्भात मी सध्या अभ्यास करत आहे. त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येईन”, असा इशाराच कंबोज यांनी दिला आहे. रोहित पवार यांच्या ॲग्रीकल्चर आणि साखर कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्याचे कंबोज यांनी ट्विटमधून स्पष्ट केलंय. “बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या यशाचं रहस्य काय, ज्याचा अभ्या करुन मी तरुणांसमोर मांडेन, ज्याचा त्यांना भरपूर फायदा होईल”, असं उपहासात्मक ट्विट करुन कंबोज यांनी रोहित पवार एकप्रकारे निशाण्यावर असल्याचंच सांगितलं आहे.

रोहित पवार मोहित कंबोज यांना काय म्हणाले होते?

मोहित कंबोज यांना मी आतापर्यंत कधी भेटलो नाही, असं सांगतानाच वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलंय. पण प्रसिद्धी माध्यमांमध्ये येण्यासाठी ते फारच धडपड करत असतात, अशा शब्दात रोहित पवारांनी कंबोजांची खिल्ली उडवली होती. तर “ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना…” असे शालजोडीतून टोलेही लगावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here