Vinayak Mete Car Driver | मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या चालकाने सर्वप्रथम ११२ नंबरवर फोन केला, हा फोन नवी मुंबई पोलिसांना फॉरवर्ड करण्यात आला. तेव्हा चालकाने आम्ही बोगद्यापाशी असल्याचे सांगितले. नवी मुंबई पोलीस तातडीने त्याठिकाणी आले तेव्हा बोगद्यापाशी कोणीही नव्हते. पोलिसांनी बोगद्याच्या दुसऱ्या बाजूलाही जाऊन बघितले. पण तिकडेही कोणीच नव्हते. आता चालकाचा तो फोन खरा होता की खोटा, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

हायलाइट्स:
- आपल्याला आता सिस्टीम बदलाव्या लागतील
- ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांचं थेट लोकेशन जायला पाहिजे होते
- मोबाईल टॉवरच्या माध्यमातून डिजिटल लोकेशन
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कालबाह्य यंत्रणेसंदर्भात भाष्य केले. विनायक मेटे यांच्या अपघाताच्यानिमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, आपल्याला आता सिस्टीम बदलाव्या लागतील. मेटे यांच्या ड्रायव्हरने ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांचं थेट लोकेशन जायला पाहिजे होते. चालकाने चुकीचा पत्ता सांगितला असला तरी मोबाईल टॉवरच्या माध्यमातून डिजिटल लोकेशन कळाले असते तर रायगड पोलीस वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले असते. यासंदर्भात कुठे दिरंगाई किंवा चूक झाली का, याबाबत चौकशी झाली आहे. काही जणांवर कारवाईही झाली आहे. पण आपण गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आणू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्यानुसार आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डिजिटल लोकेशन पोलीस स्टेशनला अवगत झाले पाहिजे. जेणेकरून त्या त्या हद्दीतील पोलिसांना योग्यवेळी माहिती मिळेल. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठे ट्रेलर्स, वाहने अनेकदा लेन सोडून चालवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम (ITS) लावली जाणार आहे. जेणेकरून आपण सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवू शकतो. ट्रॉलर लेन सोडून चालत असेल तर माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीसांनी सभागृहात सांगितला स्टार्ट टू एंड घटनाक्रम
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती सभागृहाला दिला. विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याची एक चूक विनायक मेटे यांच्या जीवावर बेतली, असा एकंदर सूर फडणवीसांच्या निवेदनातून व्यक्त होताना दिसला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता ड्रायव्हरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा तपास कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.