मेटेंच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केलं

मेटेंच्या अपघातावेळी नेमक्या चुका काय झाल्या याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माहिती दिली. मेटेंच्या चालकाकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न झाल्याचं फडणवीस म्हणाले. या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं डॉक्टर म्हणाले असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अपघातानंतर मेटेंच्या ड्रायव्हरने ११२ नंबरवर फोन केला. ड्रायव्हरने लोकेशन सांगितल्याप्रमाणे ११२ नंबरने हा फोन नवी मुंबई पोलिसांकडे गेला. नवी मुंबई पोलिसांकाडून लगेच कारवाई करण्यात आली. पण ड्रायव्हरने केलेल्या फोनला ट्रॅक केल्यानंतर योग्य लोकेशन पोलिसांना मिळाला नाही.
लोकेशन चुकीचं सांगितलं

मेटेंच्या (Vinayak Mete Accident) ड्रायव्हरने अपघात झाल्यानंतर लोकेशन चुकीचं सांगितलं. तो घाबरला होता का याची माहिती नाही. पण त्याने अपघात स्थळाची माहिती योग्य दिली नाही. चालकाने ते बोगद्याजवळ असल्याचं सांगितलं. पण नवी मुंबई पोलीस तिथे पोहोचल्यानंतर कोणीही नव्हतं. पोलिसांनी बोगद्याच्या दुसऱ्या बाजूलाही पाहिलं, पण तिकडेही कोणी नव्हतं. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी रायगड पोलिसांना कळवलं. रायगड पोलीस पोहोचले तेव्हा गाडी बोगद्यापासून लांब होती. हेही वाचा – जनतेच्या मनावर गारुड असणारे दिग्गज ८ नेते, अपघाताने ऐन भरातील राजकीय कारकीर्द संपवली
पोलिसांना लोकेशन मिळालं नाही

मेटेंच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केल्याचं फडणवीस म्हणाले. नवी मुंबई पोलिसांना लोकेशन न मिळाल्याने त्यानंतर रायगड पोलिसांना अलर्ट करण्यात आलं. रायगड पोलिसही पोहोचले, पण त्यांनाही अपघाताचं लोकेशन लगेच मिळालं नाही. काही वेळानंतर रायगड पोलिसांसह IRB ची रुग्णवाहिका केवळ ७ मिनिटांत घटनास्थळी पोहोचली, त्यानंतर पुढील मदतकार्य सुरू झालं. पण त्यांचा मृत्यू रस्त्यात झाली की जागेवरच झाला हे मेटेंचे रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
ट्रेलर्स लेन सोडून चालतात

अपघात झाल्यानंतर अपघातस्थळाचं लोकेशन योग्यरित्या जाणं गरजेचं आहे. लोकेशन थेट मिळालं असतं तर थेट रायगडलाच फोन गेला असता आणि कदाचित लवकर मदत मिळाली असती, असं फडणवीस म्हणाले. डिजीटल लोकशनच्या आधारे माहिती मिळावी अशी व्यवस्था करण्यात येईल. ट्रेलर्स लेन सोडून चालतात यावर सध्या कोणतंही नियंत्रण नाहीये, याबाबत ITMS अर्थात इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम मुंबई-पुणे हायवेवर करण्यात येईल. या सिस्टमद्वारे संपूर्ण रोडचं ट्रॅकिंग करता येईल.
लोकेशन न मिळाल्याने मदतीस वेळ लागला

सॅलेटलाईट आणि ड्रोनचा उपयोग करून आपण अशा लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलर्सवर लक्ष ठेवू शकतो. लोकेशन न मिळाल्याने मेटेंच्या अपघातानंतर मदतीस वेळ लागला. त्यामुळे लोकेशन योग्य मिळणं गरजेचं आहे. लोकेशनच्या आधारे पोलिसांना लवकर पोहोचता येईल. तसंच पहाटे ३ ते ६ पर्यंत प्रवास शक्यतो टाळावा. अशा वेळेत ड्रायव्हरला डोळा लागू शकतो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सर्वांनीच रात्रीचा प्रवास शक्यतो टाळणं महत्त्वाचं आहे.