तीन दिवसांच्या सुट्टीनंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज नियमित कामकाज सुरु झालं. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विनायक मेटे यांच्या अपघातावर, शेतकऱ्यांच्या अडचणींवर लक्षवेधी पार पडल्यावर राज्य शासनाने थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक विधानसभेत मांडलं. त्यावर चर्चा सुरु असताना विरोधकांनी विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधेयकाला विरोध करताना जोरदार भाषणं ठोकली.
“ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. त्यावेळी त्यांनी थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीला विरोध केला आणि मग आज सत्ता बददल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत कसा बदल झाला?, असा सवाल विचारताना एकनाथ शिंदेंची भूमिका सारखी का बदलते, मी अनाकलनीय आहे”, असे चिमटे भुजबळांनी काढले. “एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय तेच का बदलत आहेत हे मला कळत नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे ते स्पष्ट करा. आपण एका विचारावर ठाम राहा, तुम्हाला संधी मिळालीय. १३ कोटी लोकांच्या मनाचे तुम्ही स्वामी होणार आहात. या संधीचं सोनं करायचं असेल तर योग्य निर्णय घ्यावे लागतील”, अशी जोरदार फटकेबाजी भुजबळांनी केली. याचदरम्यान भुजबळ बोलत असताना, “एकनाथ शिंदे आपल्या दोघांच्या मध्ये बसायचे तरी कधी निघून गेले समजलंच नाही”, असा टोला अजित पवार यांनी लगावला. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील खळखळून हसले.
शिंदेसाहेब तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हीच का बदलत आहात? भुजबळांचा सवाल
“एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय तेच का बदलत आहेत हे मला कळत नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे ते स्पष्ट करा. काही महिन्यांपूर्वी योग्य वाटलेली गोष्ट तुम्हाला आता अयोग्य वाटते. सगळ्यांना थेट अधिकार द्यायचे असतील तर नगरसेवकांनी नेमकं काय करायचं?”, असा सवाल भुजबळ यांनी विचारला.