कुठे लागला फोन…
झी न्यूजच्या प्रतिनिधी अश्विन पांडे यांनी मुंबई पोलिसांना २६/११च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि तो म्हणाला की, ‘मी लाहोरचा आहे, मला मेसेज कसा पाठवायचा हेदेखील कळत नाही’. यावर रिपोर्टरकडून सविस्तर विचारणा करण्यात आली असता माझा नंबर कोणी दुसरं वापरत असावं, कारण याआधीही मला असे फोन आले, अशी माहिती संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली.
रिपोर्टरने फोन केला असता व्यक्तीने सांगितलं की तो पाकिस्तानमधील पंजाबमध्ये एमडी हाऊसमध्ये माळी म्हणून काम करतो. मला मेसेजही करता येत नाही, त्यामुळे या मेसेजबद्दल काहीही माहिती नाही. फोनही कोणाच्या हातात दिला नाही, असंही या व्यक्तीने सांगितलं. त्याचं नाव विचारला असता मोहम्मद इम्तियाज असं सांगितलं.
तो एक सरकारी नोकर असून त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. अशात त्याच्या नंबरवर कोणी दुसरं व्हॉट्सअपवर वापर असल्याचंही तो म्हणाला. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होणार असून पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचे तब्बल २६ मेसेज पाठवले आहेत. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरार परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तर त्याची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात यामुळे खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांना ही धमकी देण्यात आली आहे. भारताबाहेरच्या नंबरवरून हे मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहेत.
मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहे. या धमकीमध्ये असंही लिहण्यात आलं आहे की, भारतात ६ लोक हे काम पार पाडणार आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.