बीड : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज पुन्हा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाणी पुरवठ्याच्या नावाखाली टँकर कंत्राटदारांकडून सरकारलाच गंडा घातला जात असल्याचं सांगत यांसदर्भातील आकडेवारी सभागृहासमोर मांडली आहे.

‘टँकरद्वारे प्रत्यक्ष जेवढ्या फेऱ्या गावात मारल्या जातात त्यात आणि प्रत्यक्ष पाणी पुरवठा यात तफावत आहे, याशिवाय गावाचं आणि पाणी पुरवठा केंद्राचं ४० किमी अंतर असेल तर ते ५२ किमी दाखवलं जात आहे. जीपीएस ट्रॅकर बसवलेले आहेत, पण ते ट्रॅकर बंद आहेत. टँकरचं ट्रॅकर दुचाकीला बसवून ती फिरवली जाते. ई-टेंडरचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत आणि वर्षानुवर्षे एकाच कंत्राटदाराला कंत्राट दिलं जात आहे,’ असं म्हणत संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.

एकनाथ शिंदे आपल्या दोघांच्या मध्ये बसायचे, कधी निघून गेले कळलं पण नाही, अजितदादांची फटकेबाजी

राष्ट्रवादीच्या आमदारांनी उपस्थितीत केलेल्या या प्रश्नावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं. ‘संदीप क्षीरसागर यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, याची तातडीने विभागीय आयुक्तांकडून चौकशी केली जाईल,’ असं ते म्हणाले. त्यानंतर माजी मंत्री राजेश टोपे यांनीही यामध्ये उडी घेत हा फक्त बीडपुरता मर्यादित प्रश्न नसून राज्यभरात किती ठिकाणी शासनाला गंडा घालण्यात आलाय याचीही चौकशी करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, राजेश टोपे यांच्या मागणीनंतर बीड जिल्ह्यासोबतच इतर ठिकाणीही गैरव्यवहार झाले आहेत का, याची सखोल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here