Maharashtra Ahmednagar News : चहासाठी जन्म आमुचा… असं अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. चहा म्हणजे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरुवात असो, वा कट्ट्यावरच्या गप्पा किंवा मग रेंगाळणारी संध्याकाळ… चहा हवाच. सध्या अनेक कॅफे, रेस्टॉरंट्समध्ये चहाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच अनेकांनी वेगवेगळे चहाचे प्रकारही शोधून काढले आहेत. पण सध्या चहासोबतच तुम्हाला चहा देण्यासाठी वेगवेगळ्या कपचा वापर केला जातो. काहींनी प्लास्टिकच्या कपऐवजी, झाडांच्या पानांच्या कपाचा वापर करण्यास सुरुवात केली. तर काहींनी इटेबल कपचाही वापर सुरु केला. अनेकांनी कागदाच्या लगद्याचे कप तयार केले. प्लास्टिकच्या कपमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या. 

अहमदनगर जिल्ह्यात सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे, ‘गोल्ड कप’ची. गोल्ड कप म्हणजे, सोन्याचा कप. अस्सल सोन्यापासून तयार केलेल्या कपात चहा पिण्याची संधी नगरकरांना उपलब्ध होणार आहे. तुम्ही रिफ्रेश होण्यासाठी चहा पिता. घरातील कपबशीत किंवा एखाद्या ग्लासमध्ये. पण हाच चहा जर खऱ्या खुऱ्या सोन्याच्या कपात मिळाला तर… हो सोन्याचा कप. ही शक्कल सुचलीये अहमदनगरमधील स्वप्नील पुजारी यांना. संपूर्ण जिल्ह्यात या सोन्याच्या कपाची चर्चा रंगली आहे. 

चहा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय… सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा चहा पितो. पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी आपल्या ‘प्रेमाचा चहा’च्या दुकानात सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची सुविधा सुरू केली आहे. तब्बल सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनविले आहेत. अगदी सर्वसमान्यांना देखील सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस आता भागवता येणार आहे. अशी अनोखी संकल्पना राबविणारे राज्यातील आपण पहिले दुकानदार असल्याचा दावा पुजारी यांनी केला आहे. स्वप्नील पुजारी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात. 

विशेष म्हणजे, त्यांच्या चहाच्या दुकानात सैन्यदलातील जवान आणि पोलिसांना बाराही महिने मोफत चहा दिला जातो. त्यातच त्यांनी आजपासून सुरू केलेल्या सुवर्ण कपात चहा या संकल्पनेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

काही वेळासाठी विचार करा… तुम्ही नेहमीप्रमाणे चहा पिताय, पण तो साध्या कपात नाही, तर सोन्याच्या कपात. तेही एकदम रॉयल अंदाजात. प्रेमाचा चहा पिणाऱ्यांना आता रॉयल अंदाजात चहा पिण्याची संधी स्वप्नील पुजारी यांनी उपलब्ध करुन दिली आहे. स्वप्नील यांच्या कल्पनेची चर्चा सध्या पंचक्रोशील सुरु आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पेटत्या चुलीवर कागद, कागदावर चहा! यवतमाळच्या पठ्ठ्यानं बनवलेला ‘मॅजिक चहा’ चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here