राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे रविवार रात्री शेगावात श्री. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त करीत त्यांना पाठिंबा दिला. तर मित्र आदित्य ठाकरे यांना राज्यभरात सहानुभूती मिळत आहेत असे ते म्हणाले. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी आजच निकाल लागेल अशी आशा ही व्यक्त केली.
सीबीआयने रविवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात नाव असलेल्या १२ जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केल्यानंतर त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनिष सिसोदिया यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले, की दिल्ली सरकारने तयार केलेल्या नवीन दारू धोरणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शुक्रवारी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. सर्वसामान्य जनता दबक्या आवाजात न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय.
आज उच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही ही अपेक्षा संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. किमान सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. वेळेत न्याय झाला तरच त्याला अर्थ आहे अन्यथा त्याची किंमत शून्य आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांची दादा स्टाइल रोखठोक प्रतिक्रिया
भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करुन राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही दिवसांसाठी दिशाच बदलून टाकली. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा करताना मोहित कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. त्यांनी ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी रोहित पवार यांनी ‘दादा’ स्टाईल रोखठोक प्रतिक्रिया देत कंबोज यांचा आतापर्यंतचा इतिहासच सांगितला.
ते म्हणाले की, ‘ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना…’, असं म्हणत शालजोडीतून त्यांनी पहिला टोला लगावला. तसेच मोहित कंबोज यांना मी आतापर्यंत कधी भेटलो नाही, असं सांगतानाच वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलंय असं म्हणत त्यांची खिल्लीही उडवली.