मुंबई : “कोरोनाकाळात सगळे जण घरात बसले होते. मात्र आम्ही डॉक्टर नर्सेसच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो. आमचं काम तर करतच होतो, पण जे आमचं काम नाही, ते काम पण डॉक्टर नर्सेसच्या सूचनेनुसार करत होतो. मग आमच्या हाती काय लागलं? सहा सहा महिने पगार होत नाही… बरं पगार तरी किती? फक्त दिवसाला शंभर रुपये, म्हणजे महिन्याला ३ हजार रुपये… सकाळी ८ वाजल्यापासून कामाला सुरुवात होते, संध्याकाळी ६ पर्यंत काम करावं लागतं. पण आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. सरकार तर आमच्याकडे ढुंकून बघत नाही. ३ हजारात आम्ही कसं जगायचं? आम्हालाही लेकरं बाळं आहेत. त्यांना ३ हजारात कसं खाऊ-पिऊ घालायचं…? आमच्याकडून मोलकरणीसारखं करुन घेता पण आम्हाला अपेक्षित दाम देत नाही…” अशा काळजाला भेगा पाडणाऱ्या व्यथा महिला परिचर सांगत होत्या. आपल्या वेदना सांगताना अनेकींना अश्रू अनावर झाले होते.

मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील शेकडो परिचर महिला आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलनाला बसल्या आहेत. कुणी धुळे-जळगाववरुन आलंय, कुणी नगर नाशिकमधून आलंय, कुणी रत्नागिरीतून तर कुणी आदिवासीबहुल नंदूरबारवरुन आलंय… आपल्या लेकराबाळांना गावाकडे सोडून आपल्या मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी आणि त्या मान्य करुन घेण्यासाठी शेकडो परिचर महिला आझाद मैदानावर बसल्या आहेत.

parichar rural health care worker women agitation ४

परिचर महिलांचं आझाद मैदानावर आंदोलन

“आम्हाला किमान वेतन १८००० हजार द्यावं, सेवेत कायम करुन घ्यावं, महिला परिचरांना इतरांप्रमाणे सुट्ट्या द्यावात, कोव्हिड लसीकरण भत्ता देण्यात यावा, कार्यक्षेत्रात फिरती प्रवास भाडे देण्यात यावे, रिक्त पदांवर वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, पेंशन आणि विमा योजना लागू करावी’, अशा परिचरांच्या मागण्या आहेत.

parichar rural health care worker women agitation

परिचर महिलांचं आझाद मैदानावर आंदोलन

“सकाळी ८ वाजता कामाला सुरुवात करते. रुग्णालय उघडते, त्यानंतर संपूर्ण रुग्णालय स्वच्छ करते. त्यानंतर सीओ येतात, त्यांचीही पूर्ण तयारी करुन ठेवते. टेबल, खुर्च्या, केसपेपर नीट लावणं, रुग्णांचा डायबेटिज आणि बीपी चेक करणे, आम्हाला त्या लोकांनी शिकवलंय म्हणून आम्ही ते सर्व करतो. ते आम्हाला मान्यही आहे. ती आमची कामं नाहीत तरी आम्हाला सर्व कामं करावी लागतात. पण, सरकार या कामाच्या मोबदल्यात आम्हाला फक्त ३ हजार रुपये पगार देतं. आम्हाला ते परवडत नाही. मी स्वत: रोज ७० रुपये खर्च करुन सबसेंटरला हजर होते आणि त्यावर मला फक्त ३ हजार रुपये मानधन मिळतं. सरकार आमचा विचार करणार आहे की नाही… आम्ही खूप गरीब आहोत. सरकारने आम्हा मदतनीसांना परकं म्हणून टाकून दिलं आहे”, अशा वेदना सांगताना, “सरकारला आमची थोडीजरी दया येत असेल तर त्यांनी आमचा विचार करावा. ३ हजारात आम्ही कसं जगायचं?” असा आर्त सवाल पालघरमध्ये परिचर म्हणून काम करणाऱ्या कविता किशोर पाटील यांनी केला.

parichar rural health care worker women agitation 2

परिचर महिलांचं आझाद मैदानावर आंदोलन

अहमदनगरच्या जामखेडमधल्या सुनिता वडवकर सांगत होत्या, “सकाळपासून खूप कामं करावी लागतात, लसीकरणाला जावं लागतं. आम्हाला स्वखर्चाने जावं लागतं. गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला पगार नाही, आता झाला, तो ही पूर्ण नाही. आम्ही कसं जगायचं आणि आमच्या लेकरा-बाळांना कसं जगवायचं? सरकारला जाग यावी आणि आम्हाला १८ हजार पगार द्यावा, अटल पेन्शन योजना लागू करावी, अर्धा वेळ आहोत तर सरकारने पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून सेवेत घ्यावं, कोरोनाचा भत्ता द्यावा, गणवेशाचे पैसे द्यावे. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात”

parichar rural health care worker women agitation

परिचर महिलांचं आझाद मैदानावर आंदोलन

देशाच्या सर्वच भागांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या बळकटीकरणाच्या हेतूने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ‘आशा’ कर्मचारी ही संकल्पना राबवली गेली, त्याला १७ वर्षं झाली. या कालावधीत ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्यसेवेचे भरीव काम करून दाखवले आहे. त्यांच्यात सोबतीने परिचर काम करत आहेत. मग त्यांच्यासारख्याच सोयीसुविधा आम्हाला का मिळत नाही? असा सवालही परिचरांनी उपस्थित केला.

मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मंत्री आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईतच आहेत. लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे यावं, आमच्या मागण्या ऐकाव्यात, रास्त मागण्या पूर्ण कराव्यात, आमच्या अवाजवी मागण्या नाहीयेत, आम्ही फक्त आमच्या कामाचा दाम मागतोय, असं आवाहन महिला परिचारांनी राज्य शासनाला आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here