पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एक दुचाकीस्वार कारला जोरात येऊन धडकला. डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच अशी घटना घडल्याने कार चालकाचा एकच गोंधळ उडाला. या अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावर हा अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराचे नशीब चांगले म्हणून त्याचा जीव वाचला आहे. या अपघातात बाळू गेनू शिळवणे हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दुचाकीस्वार वेगात गाडी चालवत होता. ओव्हरटेक करताना त्याची गाडी ही डाव्या बाजूच्या लेनमध्ये घेत असताना ओव्हर टेक करताना तो निम्म्या मार्गात आला होता, मात्र समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने तो समोर असलेल्या कारच्या बोनेटवर जाऊन आदळला. मात्र, कुठल्याच वाहनाच्या खाली तो आला नाही. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
हा व्हिडीओ पाहताना कुणाच्या काळजाचा थरकाप उडाल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे वाहने चालवताना प्रत्येकाने काळजी घेऊन आणि वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहन चालवले पाहिजे.