पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील असोला पाटीजवळ भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. शनिवारी (दिनांक २०) सायंकाळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी काम करून बँक बंद करून घरी गेले होते. रविवारी बँकेला सुट्टी असल्याने तिकडे कोणीही फिरकले नाही. त्यानंतर आज सकाळी १० वाजता बँकेचे कर्मचारी आले असतांना बँकेचे पाठीमागील कुलुप उघडले दिसले. त्यामुळे बँकेत चोरी झाल्याचे लक्षात घेऊन त्यांनी तातडीने हट्टा पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक संदीप तावडे, जमादार भुजंग कोकरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बँकेत पाहणी केली असता,बँकेच्या मुख्य तिजोरीचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
रात्रीच्या वेळी ई बीट प्रणाली अंतर्गत पोलिसांची तीन वेळेस या परिसरात गस्त झाली. त्यामुळे पोलिस आल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढल्याने बँकेच्या तिजोरीत असलेले सुमारे ५ लाख रुपये व सुमारे ६० लाख रुपये किंमतीची सोने सुरक्षीत राहिले आहे. या प्रकरणी बँकेचे कर्मचारी सुधाकर सिदलंबे यांच्या तक्रारी वरून हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक तावडे पुढील तपास करत आहेत.
या भागात हट्टा पोलिसांची गस्त झाल्यामुळे बँकेतील रक्कम व सोने सुरक्षीत राहिले आहे. बँकेला यापूर्वीही सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर या घटनेनंतरही सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याबाबत कळविण्यात आल्याचे हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी सांगितले.