मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत असलेली वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. खरी शिवसेना आमच्यासोबतच आहे, असं म्हणत फडणवीस हे वारंवार उद्धव ठाकरेंना डिवचत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकदार शब्दांत टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे उचकी लागल्याप्रमाणे बाळासाहेबांच्या नावाचा जप करत आहेत. काय तर म्हणे, मुंबई महापालिकेत भाजपास मते द्या. आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न साकार करू. काय हे ढोंग? बाळासाहेबांनी ढोंगाचा सदैव तिरस्कार केला. पण या मंबाजींना खरेच बाळासाहेब कळलेत का? बाळासाहेबांची कोणती स्वप्ने तुम्ही साकार करणार आहात? शिवसेनेत फूट पाडून व त्या बळावर मुंबईवरील भगवा उतरवण्याचे तुमचे स्वप्न हे काय बाळासाहेबांचे स्वप्न झाले? मऱ्हाटी जनता तुमच्या ढोंगावर आणि सोंगावर थुंकते,’ असं म्हणत ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच स्वतंत्र वीज पुरवठा कंपनी; देशातील पहिलाच प्रयोग

‘फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण’

शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र फडणवीस यांनी आता थेट शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असल्याचं दिसत आहे. ‘फडणवीस वगैरे पुढारी बाळासाहेबांचे स्वप्न उराशी कवटाळून बसले आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेशी ‘युती’ तोडताना या महामंडलेश्वरांना बाळासाहेब आठवले नाहीत. २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द तोडतानाही त्यांना बाळासाहेबांच्या स्वप्नांचे स्मरण झाले नाही. आता मोठे आले बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला! फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण आहे. मुंबई-ठाणेकरांनी सावध राहायला हवे. राज्यात फक्त थिल्लरपणा सुरू आहे. सत्य फक्त हेच आहे की, मुंबईतून मराठी एकजूट संपवायची आहे व त्यासाठी शिवसेनेवर घाव आणि घाव घालायचे आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार?’ असा खोचक सवालही शिवसेनेनं विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here