Govinda pathak member died in Mumbai | दोन वर्षांच्या खंडानंतर मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवाला आणखी एक गालबोट लागले आहे. गेल्याच आठवड्यात साजऱ्या झालेल्या दहीहंडीच्या उत्सवात अनेक गोविंदा जखमी झाले होते. यापैकी विलेपार्ले येथील शिवशंभू गोविंदा पथकांचा सदस्य संदेश प्रकाश दळवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे.

हायलाइट्स:
- सर्व गोविंदांचा विमा उतरवला जाणार होता
- घोषणा केल्यानंतर इतक्या कमी काळात विमा उतरवणे शक्य झाले नसावे
- यासंदर्भात संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला प्रश्न विचारले जातील
गोविंदा पथकातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यासाठी सर्व गोविंदांचा विमा उतरवला जाणार होता. परंतु, घोषणा केल्यानंतर इतक्या कमी काळात विमा उतरवणे शक्य झाले नसावे. त्यामुळे आता सरकार थेट संदेश दळवी याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देईल. यासंदर्भात संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला प्रश्न विचारले जातील. दहीहंडी उत्सवादरम्यान काही गोविंदा जखमी झाले आहेत. राज्य सरकारने मृत्यू झालेल्या गोविंदांच्या कुटुंबीयांना १० लाख आणि अपंग झाल्यास गोविंदांना ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना किमान तशा सूचना द्याव्यात. जेणेकरून जखमी गोविंदांना तातडीने तशी मदत देता येईल. आम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारची भूमिका जाणून घेऊ, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक
पूरग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना आज शिंदे-फडणवीस सरकारकडून उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात अजित पवार यांनी म्हटले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोगलगायींमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भातही सभागृहात लक्षवेधी मांडली जाणार आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, याबद्दल सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करायला पाहिजे. आता राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करते, हे पाहावे लागेल, असे अजित पवार यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.