मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी जांभुळवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा अनोळखी मृतदेह कोणाचा आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं नेमली होती. व्हॉट्सअॅपवर त्या मृतदेहाचा फोटो प्रसारित केल्यानंतर तो फोटो पाहून विजय दुपारगुडे नामक इसमाने पोलीस स्टेशन गाठत हा आपला भाऊ महादेव असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या तपासला अधिक वेग आला.
पोलिसांनी महादेवचे कॉल डिटेल्स तपासले. तो कुठं गेला होता हे पाहिलं आणि तांत्रिक तापसानंतर तुषाराला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला तुषारने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र खुनाच्या दिवशी तुषार आणि महादेव यांच्यातील झालेले फोन कॉल पोलिसांनी दाखवले अन् पोलिसी खाक्या दाखवताच तुषारने खुनाची कबुली दिली.
खून झालेली व्यक्ती महादेव आणि खून करणारे आरोपी हे एकमेकांच्या नात्यातील आहेत. महादेव हा तुषार याचा नात्याने चुलत मेव्हणा आहे. मात्र तरी देखील तो तुषार याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत होता आणि तिला अश्लील मेसेज करून त्रास देत होता. यापूर्वी त्याला अनेकदा समजून सांगण्यात आलं होतं. परंतु तरी देखील त्याचा वागणं काही बदलत नव्हतं. १९ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या दिवशी तुषारने महादेवला पत्नीच्या आईच्या घरी वडगाव धायरी येथे बोलून घेतले. तेथे त्याला परत सर्वांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा तो ऐकत नव्हता. त्यावेळी रागात तुषार, त्याची पत्नी व इतर साधीदारांनी त्याला मारहाण केली. यात महादेव बेशुद्ध पडला. महादेव बेशुद्ध पडल्याचे पाहिल्यानंतर रिक्षाने त्याला जांभूळवाडी परिसरातील दरीपूल येथे टाकून देण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळला होता.
दरम्यान, पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, उपनिरीक्षक गौरव देव, उपनिरीक्षक अंकुश कर्वे, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, मीतेश चोरमोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ हे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.