सध्या शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर सर्वोच्च न्यायालयात खल सुरु आहे. वारंवार सुनावणी पुढे ढकलत असताना आज तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. हाच धागा पकडून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसैनिकांना संबोधित करताना केलेल्या भाषणादरम्यान जोरदार फटकेबाजी केली. शिवसेना सोडताना बाळासाहेबांच्या प्रेमाच्या मिठीचा प्रसंग, शिवसेनेत झालेली बंड, सध्याची राजकीय परिस्थिती, त्यांच्यावर नुकतीच पार पडलेली शस्त्रक्रिया या सगळ्यावर भाष्य करताना राज यांनी आपल्या स्टाईलने फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणाला मनसैनिकांनी जोरदार दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
“वारसा हा वास्तूचा नसतो. वारसा हा विचारांचा असतो. माननीय बाळासाहेबांचा तो विचार मला पुढे न्यायचाय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचार मला पुढे न्यायचाय. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय आणि नसलं काय… याने काही फरक पडत नसतो.. माझ्याकडे विचार आहे जी सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे… बाकी मला माहिती नाही पण त्यांच्या विचारांमुळे मी खूप श्रीमंत आहे”, असं राज ठाकरे म्हणताच उपस्थित मनसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी उद्धव ठाकरेंनाच टोला मारल्याचं मनसैनिकांना कळालं, पुढे १ मिनिटे टाळ्यांचा कडकडाट सुरु होता.
शिवसेनेतलं एकनाथ शिंदे यांच्या रुपाने आजपर्यंतचं सर्वांत मोठं बंड यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. “आतापर्यंत भुजबळ, राणे, गणेश नाईक यांनी बंड केली. माझंही नाव बंड केलं म्हणून घेतलं जातं. पण माझं बंड नव्हतं. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. तर सध्याची राजकीय परिस्थिती ही अॅडजेस्टमेंट आहे. याकडे आपण संधी म्हणून पाहायला हवं. आपल्यावर बिनबुडाचे आरोप लागतायेत. आंदोलन अर्ध्यावरतो सोडतात वगैरे, अशा आरोपांना पक्ष कार्यकर्त्यांनी जोरकसपणे उत्तरं द्यायला हवीत”, असं राज म्हणाले.