जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगरात एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. प्रवीण उर्फ सागर दिनकर साठे (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव आहे. पत्नी व मुलगी माहेर गेलेली असताना घरी पतीने आत्महत्या केली असून आत्महत्येमागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

धरणगाव तालुक्यातील रोटवद या गावातील मूळ रहिवासी प्रवीण उर्फ सागर दिनकर साठे हा पत्नी व मुलीसह जळगाव शहरातील एमआयडीसी पसिरातील पंढरपूर नगरात वास्तव्यास होता. तो चटई कंपनीत कामाला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी ही मुलीला सोबत घेऊन तिच्या माहेरी गेली होती. मंगळवारी प्रवीण कामावर गेला नव्हता, तर दुसरीकडे त्याची पत्नी कविता ही त्याला मोबाईलवर संपर्क साधत होती. मात्र तो फोन उचलत नव्हता, तसंच कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे कविता हिने शहरातील रामेश्वर कॉलनी येथील पती प्रवीण याच्या चुलत मामाला मोबाईलवरुन संपर्क साधला. तसंच घरी जाऊन प्रवीणची माहिती घेण्यास सांगितले.

गुंडांना संरक्षण असेल, तर तपास कसा होणार?; एकनाथ खडसेंचा रोख कोणाकडे

कविता हिने सांगितल्यानुसार प्रवीणचे चुलत मामा समाधान महाजन यांनी घरी जाऊन पाहणी केली असता, घरी प्रवीण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. समाधान महाजन यांनी या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मृत प्रवीण याच्या पश्चात आई कल्पना, भाऊ जितेंद्र, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here