रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आज राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मतदार संघातील परतवाडा येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंदी सिने अभिनेता शक्ती कपूर व मराठी सिने अभिनेता श्रेयस तळपदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर सडकून टीका केली. बच्चू कडू यांच्या मतदारसंघातच कार्यक्रम आणि त्यांच्यावरच टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, २० वर्षांपासून फाटकी झोळी दाखवून या मतदारसंघातील आमदारांनी बॅगा भरल्या. भावनेचे राजकारण करत, खोटं बोला पण रेटून बोला, या प्रकारे त्यांनी जनतेची दिशाभूल केली. या ठिकाणी कुठलाही मोठा प्रकल्प आला नाही. अचलपूर जिल्ह्याची मागणी आम्ही पूर्ण करू. अमरावतीवरून मेळघाट मार्गे मध्यप्रदेशात जाणारा मार्ग तयार करणार असून सर्वसामान्यांची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलाचे पुनर्जीवन करण्याचे आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी दिले.
शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० कोटी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनातील चारही दिवस विरोधकांनी सभागृहाबाहेर यावरून जोरदार घोषणाबाजी केली होती. ‘५० खोके, एकदम ओक्के’, अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे गटाला जेरीस आणले होते. त्यामध्ये आता रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्षपणे का होईना पण पैसे घेतल्याचा आरोप केल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.