मुंबई : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं जात आहे. विशेषत: ‘५० खोके, एकदम ओके’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना डिवचलं जात होतं. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधाऱ्यांनी पलटवार करत विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
महाविकास आघाडी सत्तेत असताना भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी घोषणाबाजीने विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचा उल्लेख करत भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. ‘अनिल देशमुख यांचे खोके…सिल्वर ओक ओके….लवासाचे खोके, सिल्वर ओक ओके….महापालिकेचे खोके, मातोश्री ओके….स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके…सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके,’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. बिहारच्या सत्तासंघर्षात CBIची एन्ट्री; बहुमत चाचणीआधी २४ ठिकाणी छापेमारी, आरजेडीचे नेते रडारवर
राष्ट्रवादीविरोधात घोषणाबाजी करताना शिंदे गटातील आमदार आक्रमक रुपात पाहायला मिळाले. मात्र भाजप आमदारांनी ‘मातोश्री’चं नाव घेताच या गटाच्या आमदारांच्या चेहऱ्यावर काहीसा संभ्रम पाहायला मिळाला.
दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या घोषणाबाजीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेतृत्वातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.