Amol Mitkari vs MLA Mahesh Shinde | सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. आम्ही १७० आमदार उतरलो असतो तर त्यांचे काय झाले असते? आम्ही काय बांगड्या भरल्यात का?

 

BJP Shinde camp vs MVA
विधानभवनात राडा

हायलाइट्स:

  • ‘५० खोके, एकदम ओक्के’
  • ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी’
  • ‘बीएमसीचे खोके, मातोश्रीचे ओके’
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तेव्हा दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे विधानभवनातील वातावरण प्रचंड तापले होते. हा वाद मिटल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी तुम्हाला धक्काबुक्की केली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर भरत गोगावले रागाने उसळून म्हणाले की, ‘अरे हट्! ते आम्हाला कसली धक्काबुक्की करणार आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली’. त्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

भरत गोगावले यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही १७० आमदार उतरलो असतो तर त्यांचे काय झाले असते? आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी विरोधकांना झोंबली, त्यामुळे त्यांनी मध्ये येऊन गोंधळ घातला. मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यांनी आमचा नाद करू नये. यापुढे कोणीही आमच्या अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, असे भरत गोगावले यांनी म्हटले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये बाचाबाची; मिटकरी-रोहित पवार सत्ताधाऱ्यांना भिडले, अखेर अजिततदादा मध्ये पडले
अजित पवारांनीही सत्ताधाऱ्यांना डिवचलं

या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ‘५० खोके, एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

शिंदे गटातील आमदाराकडून आई-बहिणीवरून शिवीगाळ: मिटकरी

आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्याचाही प्रयत्न केला,’ असा आरोप अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here