मुंबई : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कामाची चांगलीच छाप पाडली आहे. पहिल्या दिवसापासून सत्ताधारी मंत्र्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी ते सोडत नसल्याचं दिसत आहे. आजही अजित पवार यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी विधिमंडळात एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराबाबत जोरदार आक्षेप घेत गावित यांना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं.
कुपोषणामुळे बालमृत्यू झालेलेच नाहीत, असं उत्तर आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलं. गेल्या ५ वर्षांच्या काळात १६ आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणामुळे ८ हजार ८४२ मृत्यू झालेत, हे खरं आहे का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना विजयकुमार गावित यांनी कुपोषणामुळे मृत्यू झालेलेच नाहीत, असं उत्तर दिलं. ज्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह काही सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. तरीही विजयकुमार गावित हे त्यांच्या उत्तरावर ठाम होते. अरे हट्! ते आम्हाला कसली धक्काबुक्की करणार आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली: भरत गोगावले
विधानसभा अध्यक्षांनीही तुमच्या उत्तरात आणि खऱ्या परिस्थितीत काही तफावत येऊ नये, यासाठी हा प्रश्न राखून ठेवून, उद्या माहिती द्या, अशी सूचना विजयकुमार गावित यांना केली. मात्र माहितीत कोणतीही तफावत आढळणार नाही, अशी ठाम भूमिका गावित यांनी घेतली. यानंतर अजित दादांनी गेल्या एक महिन्यातली मेळघाटातील आकडेवारीच दाखवली. एकट्या मेळघाटात फक्त एक महिन्यात १८ बालमृत्यू कुपोषणामुळे झाले आहेत आणि तुम्ही ही अजब आकडेवारी कशी देता, असा सवाल अजित पवार यांनी केला.
दरम्यान, अजित पवार यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर विजयकुमार गावितांना माघार घ्यावी लागली आणि आणखी एकदा माहिती मागवून उत्तर देतो, असं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे अखेर हा प्रश्न राखीव ठेवण्यात आला.