Pune Adulterated Ghee News: देशात बाजारात भेसळयुक्त वस्तू, पदार्थ अतिशय बिन्धास्तपणे विकल्या जातात. आरोग्यासाठी हानिकारक, धोकादायक असलेल्या अनेक वस्तूंची भेसळ करुन मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या भेसळयुक्त वस्तूंमुळे ग्राहकांचं आर्थिक नुकसान तर होतंच, त्याशिवाय त्यांचं आरोग्य बिघडण्याचाही धोका असतो. अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी अशाप्रकारच्या भेसळयुक्त वस्तूंवर, गोदामांवर कारवाई करत भेसळ करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण याला न जुमानता अनेक व्यापारी, दुकानदार बिनदिक्कतपणे भेसळ करतात. नुकतंच वनस्पती तुपाच्या भेसळीचं प्रकरण (Identify Real And Fake Ghee) उघडकीस आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने घाऊक व्यापाऱ्याकडून तब्बल सात लाख ३८ हजार ४९७ रुपयांच्या किमतीचं भेसळयुक्त तूप जप्त केलं आहे.

पुण्यात भेसळयुक्त तुपाचा साठ जप्त

महाराष्ट्रात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. अशात घरात गोडधोड केलं जातं. तसंच बाहेरुनही अनेकदा मिठाई मागवली जाते. अशावेळी वनस्पती तूप घरात वापरणार असाल तर सावध व्हा. तसंच बाहेरुन पदार्थ खरेदी करणातानाही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. पुण्यात भेसळयुक्त तुपाचा मोठा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. हे तूप तमिळनाडूतून पुण्यात आणण्यात आलं होतं.

भेसळयुक्त तूप मानवी आरोग्यास धोकादायक

या तुपाचे नमुने घेतले असता हे तूप मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं समोर आलं आहे. घाऊत विक्रेते आणि वितरकांकडून भेसळयुक्त तुपाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत या तुपाची तपासणी केल्यानंतर या तुपावर कारवाई करण्यात आली. तुम्हीही अशाप्रकारे बाहेरुन तूप आणत असाल, किंवा काही पदार्थ घेत असाल, तर सावध राहणं महत्त्वाचं आहे. अशा भेसळयुक्त तुपामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मानवी आरोग्यास असं तूप धोकादायक ठरू शकतं. हेही वाचा – अपघातात एक पाय कापावा लागला पण ‘तो’ जिद्दीने पेटला अन् थेट जग जिंकलं!

भेसळयुक्त तुपाचे परिणाम

बनावट तूप खाण्यामुळे हृदरोग, हाय ब्लडप्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. तसंच लिव्हर खराब होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढते. अशा तुपामुळे महिलांमध्ये गर्भपाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी घरी तयार केलेलं तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. बनावट तुपामुळे मेंदुला सूज येऊ शकते. अपचन, पोटदुखी, गॅसची समस्याही होऊ शकते. अन्न सुरक्षेसंबंधी कोणतीही मानकं न पाळता हे भेसळयुक्त तूप बनवलं जातं त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो.

बनावट तूप

तुपातलं ट्रान्स फॅटचं प्रमाण दोन टक्के असावं लागतं, पण पुण्यात आढळलेल्या या भेसळयुक्त तुपात हे प्रमाण तब्बल सहा टक्के आढळलं. अशाप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. तूप असली की नकली हे घरच्या घरी ओळखता येऊ शकतं. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात एक चमचा तूप टाका. जर तूप पाण्यावर तरंगलं तर समजा ते तूप शुद्ध आहे. तूप पाण्याखाली बसलं, तर ते बनावट असेल.

या पद्धतींनेही ओळखता येईल तुपातली भेसळ?

तूप गरम करा. ते विरघळलं आणि त्याचा रंग बदलून काहीसा करडा झाला तर ते शुद्ध तूप असेल. जर रंग पिवळा झाला तर ते तूप बनावट असू शकतं. शुद्ध तूप हातावर घेतल्यानंतर ते विरघळलं तर ते शुद्ध तूप समजता येईल. पण तूप जाडच राहिलं, तर ते नकली भेसळयुक्त तूप असल्याचं समजू शकता. तसंच भेसळयुक्त तूप तपासण्यासाठी एक चमचा तुपात ५ मिली हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. जर तुपाचा रंग बदलून लाल झाला, तर तुपात डाय भेसळ केल्याचं समजता येईल, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here