सुप्रिया सुळे यांच्या या दोन्ही ट्विटसचा सूर उपरोधिक आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपचे नेते काहीही घडले की राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही, असे सांगत रान उठवत फिरायचे. सुप्रिया सुळे यांनीही हेच अस्त्र आता भाजपविरोधात वापरले आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत युती करून सत्तेत बसलेल्या लोकांच्या (एकनाथ शिंदे गट) या कृतीनंतर तुम्ही कारवाई करावी. तसेच सत्ताधारी आमदारांकडून वाढत असलेला धोका पाहता महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना केली आहे. त्यामुळे आता यावर अमित शाह किंवा भाजपच्या गोटातून काही प्रतिक्रिया येणार, का ते पाहावे लागेल.
दरम्यान, विधानभवनातील या राड्याप्रकरणी दोषी आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे याबद्दल तक्रार करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात शिंदे गटाने अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांची तक्रार केली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, ते पाहावे लागेल. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्ष अजित पवार सामोपचाराने हा वाद मिटवतात का, हेदेखील पाहावे लागेल.
विधानभवनात नेमकं काय घडलं, राडा कसा झाला?
बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी मविआच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. ‘गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशी घोषणाबाजी मविआने केली. हे सगळे सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे हे रागाच्या भरात एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे विधानभवन परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता.