Inside Story of Vidhan Bhavan Rada : महाराष्ट्राच्या विधान भवनातील सत्ताधारी-विरोधकांमधील धुमश्चक्री आज सगळ्या राज्याने पाहिली. चौकातले दोन गट आमने-सामने यावेत तसे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी समोरासमोर येऊन एकमेकांना धक्काबुक्की केली. अधिवेशन काळात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, राज्यातल्या ऐरणीच्या प्रश्नांवर आणि अडचणींवर साधक बाधक चर्चेतून मार्ग काढून जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, लोककल्याणकारी योजना आखाव्यात, असं साधारण अधिवेशन काळात अपेक्षित असतं. पण आज हे सगळं चित्र इतिहास जमा झालं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक हमरातुमरीवर आले, एवढ्यावरही प्रकरण शांत झालं नाही, दोन्ही गटांत धक्काबुक्कीही झाली. या सगळ्या गोंधळावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जे चाललंय ते बरोबर नाही, असं सांगत आपल्या आमदारांना समज देऊन सभागृहाच्या दिशेने घेऊन गेले. पण या सगळ्या वादाला कारणीभूत ठरला फक्त एक ‘गाजराचा हार’….! वाचा आता या वादापाठीमागची इनसाईड स्टोरी….

घोषणाबाजी, वादावादी, गदारोळ आणि धक्काबुक्की…!

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला “लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के” अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान राष्ट्रवादीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारला डिवचण्यासाठी तसेच सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी गाजराचा हार आणला. थोड्या वेळानंतर त्यांनी तोच हार गळ्यात घातला आणि त्यांच्यासहित विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरजोरात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. (फोटो सौजन्य : राहुल मोरे)

सगळा खटाटोप एक हार हिसकावून घेण्यासाठी…!

याचवेळी त्यांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्यासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले पुढे सरसावले. त्यांनी आमदार पाटील यांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अनिल पाटील यांच्या मदतीला मिटकरी धावून आले. त्यांनीही अनिल पाटील यांच्या कडेला थांबून जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. मग एन्ट्री झाली कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची… हार हिसकावण्यासाठी गोगावले, महेश शिंदे-मिटकरी यांच्या अंगावर धावून गेले.. परंतु आमदार अनिल पाटील गाजराचा हार सोडायला काही तयार नव्हते. (फोटो सौजन्य : राहुल मोरे)

अजित पवारांनी नमतं घेतलं

या गोंधळात मात्र दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. तिथे रोहित पवारही होते. ते देखील सगळा प्रकार पाहून संतापले. त्यांनीही जोरात घोषणाबाजी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सुनावलं. या सगळ्या गोंधळावर विरोधी पक्षनेते अजित पवार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “जे चाललंय ते बरोबर नाही सत्ताधाऱ्यांना आमची घोषणाबाजी, आम्ही केलेले आरोप खटकले. ते जाणीवपूर्वक आक्रमक झाले. खोक्यांवरुन केलेली घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी धक्काबुक्की केली”, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या जमखेवर मीठ चोळलं. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारांना समज दिली अन् त्यांना घेऊन विधिमंडळ सभागृह गाठलं. (फोटो सौजन्य : राहुल मोरे)

मिटकरींनी आमदार महेश शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली

अमोल मिटकरी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले. अमोल मिटकरी यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. महेश शिंदे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की केली, त्यांच्याविरोधात अॅक्शन घ्यावी, त्यांना लगोलग समज देण्यात यावी, अशी मागणी मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होतं. मात्र तुमच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्याचाही प्रयत्न केला, अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (फोटो सौजन्य : राहुल मोरे)

मी अयोग्य वर्तन केलंच नाही : महेश शिंदे

मी अमोल मिटकरी यांना ढकललं, हा दावा चुकीचा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने अमोल मिटकरी यांचे वर्तन पाहिले आहे. त्यांनी धक्काबुक्की केल्यानंतर पुढील सगळ्या गोष्टी घडल्या. अमोल मिटकरी हे जहाल विचारांचे आहेत, लोकशाही विचार त्यांना मान्य नाहीत. अमोल मिटकरी हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग असल्याची जळजळीत टीका शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केली. अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांशी भिडले होते. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. (फोटो सौजन्य : राहुल मोरे)

सुप्रिया सुळेंची थेट अमित शाहांकडे तक्रार

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानभवन परिसरात झालेल्या राड्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते अमित शाह यांच्याशी संपर्क साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपची तक्रार शहा यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही तातडीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. तसेच एकूण परिस्थितीचा विचार करता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकशाही मूल्यांची शिकवण द्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य : राहुल मोरे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here