मुंबई : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी आमची अपेक्षा होती. एवढं सगळा सुरत गुवाहाटीचा प्रवास केला… शिवाजी महाराजांनी १७ वेळा सुरत लुटली, त्याच सुरतेला तुम्ही शरणागतीसाठी गेला, स्वारी करण्यासाठी नव्हे… तुमच्या शरणागतीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. पुढे सुरतेवरुन तुम्ही गुवाहाटीला गेला. तिथे तुम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला गेला होतात म्हणे… पण तिथे अनेकांनी डोंगार, झाडी-हाटील पाहिलं… हा सगळा प्रवास करुन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं आम्हाला वाटलं. देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतात, अशी अगोदर आमची खात्री होती. पण आता तो आमचा समज आहे…”, अशी तुफान फटकेबाजी करत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी कैक कोपरखळ्या देवेंद्र फडणवीसांना लगावल्या. जयंतरावांच्या फटकेबाजीने संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात न्हावून निघालं.

विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, त्यांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांचंही तोडीस तोड उत्तर, याचदरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी अन् विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये उडलेली धुमश्चक्री, एकमेकांची कॉलर पकडून झालेली हमरीतुमरी, अशा सगळ्या अभूतपूर्व गोंधळानंतर आज सभागृहाचं नियमित कामकाज पार पडलं. दिवसभर सत्ताधारी विरोधकांमध्ये ही शाब्दिक लढाई सुरुच होती. पण जयंतराव पाटील भाषणाला उभे राहिले अन् सकाळपासूनच काहीच झालं नाही असं भासवत जयंतरावांनी आपल्या स्टाईलने फटकेबाजी करायला सुरुवात केली.

जयंतराव पाटलांची फटकेबाजी

“फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी आमची अपेक्षा होती. सुरत गुवाहाटीचा प्रवास केल्यावर तेच मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटायचं, पण त्यांना सीएम इन वेटिंग केलं डायरेक्ट… म्हणजे ज्या नेत्याला पंतप्रधान होण्याचा योग भविष्यकाळात येऊ शकतो, असं आम्ही समजत होतो. त्या नेत्याला उपमुख्यमंत्री करुन महाराष्ट्राच्या एका नेत्याचा भाजपने अपमान केला, असं म्हणत जयंतरावांनी फडणवीसांच्या जखमेवरची खपली काढून त्यांना आणखी वेदना दिल्या.

भर सभागृहात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, नंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही सोडलं नाही!
एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेलक्या शब्दात एकनाथ शिंदेंना टोले लगावले. “भाजप शिवसेना सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदेंची मी एक क्लिप पाहिली, त्यात ते भाजपच्या कारभारावर चिडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात राजीनामा देतात. पण आज गुवाहाटीला जाऊन भाजपसोबत हातमिळवणी करुन शिंदेंनी सरकार स्थापन केलं. त्याचवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन खाली खेचताना त्यांना माहिती नाही पण शिवसैनिकांना प्रचंड वेदना झाल्या”, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या घेतल्या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जातील, असं वाटलं होतं, पण फार दिवसांनी त्यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची आठवण झाली… असा टोमणाही त्यांनी शिंदेंना लगावला.

आज आमदारांमध्ये राडा का झाला? अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं
जयंतरावांचे खातेवाटपावर तिरकस बाण

“खातेवाटपात काय झालं… चंद्रकांतदादांवर किती अन्याय….उच्च आणि तंत्रशिक्षण खातं चंद्रकांतदादांना दिलं.. मंत्रिमंडळात एकच ध्रुवतारा आहे तो म्हणजे गुलाबराव पाटील… त्यांचं पाणीपुरवठा खातं कुणालाही बदलता आलं नाही… सगळ्यांची खाती बदलली पण त्यांचं खातं बदललं नाही. आमचे शंभूराज देसाई…. किती तुमची बाजू घ्यायचे पण त्यांनाही एक्साईज डिपार्टमेंट दिलं….”, अशा शब्दात जयंतरावांनी खातेवाटपावर तिरकस बाण सोडले. जयंत पाटलांच्या खातेवाटपावरील टोल्यांवर मंदा म्हात्रे म्हणाल्या, एक्साईज खातं चांगलं आहे.. त्यावर पुन्हा जयंत पाटील म्हणाले, “कसं काय चांगलं आहे… अच्छा गणेश नाईकांकडे एक्साईज खातं होतं, त्यामुळे मंदाताई तुम्हाला ते खातं चांगलंच वाटणार…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here