महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधान परिषदेसाठी बारा नावे राज्यपालांना देण्यात आली. पण दोन वर्षानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतला नाही. ती यादी रद्द करावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिले आहे. आता नवीन बारा नावे देण्यात येणार आहेत. या नावांत कोल्हापूरातील काही नावांची चर्चा आहे. यामध्ये हाळवणकर व क्षीरसागर यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर या गटात जाणारे क्षीरसागर हे पहिले माजी आमदार होते. कॅबीनेट मंत्रीपदाचा दर्जा असतानाही त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. यामुळे या गटाला ज्या चार जागा मिळणार आहेत, त्यामध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून २०२४ ला भाजपच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे हे मैदानात उतरणार हे निश्चित आहे. लवकरच ते या पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. यामुळे दोन वेळा आमदार झालेल्या हाळवणकरांचे पुर्नवसन करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. जाधव हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीही यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, हाळवणकरांचे नाव पुढे आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जाधव हे अध्यक्ष होते. पण ही समिती महाविकास आघाडी सरकारने बरखास्त केली. याविरोधात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याच्यावर लवकरात लवकर पडदा पडावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश आल्यास जाधव यांना पुन्हा अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. यामुळे विधान परिषदेपेक्षा जाधव यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे. क्षीरसागर यांच्या सौभाग्यवती वैशाली क्षीरसागर या समितीच्या कोषाध्यक्षा होत्या. क्षीरसागर यांना विधान परिषदेवर संधी मिळाली नाही तर सौभाग्यवतींना पुन्हा अंबाबाई पावण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.