चंद्रपूर : बल्हारपूर वन परिक्षेत्रातील विसापूर हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वाढले होते. तसंच या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक धास्तावले होते. या पार्श्वभूमीवर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर वनविभागाने बुधवारी रात्री या बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले आहे. वनविभागाने बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, बोटॅनिकल गार्डन नजीक लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. वनविभागाने जेरबंद केल्यानंतर बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.