Governor Appointed MLC in Maharashtra | रामदास कदम यांनी सांगितले होते की, रामदास कदम मंत्रिमंडळात नसेल आणि विधानपरिषदेतही नसेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गेले १२ वर्षे विधानपरिषद सदस्य होते. उद्धव ठाकरे यांच्याकडुन त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे रामदास कदम नाराज होते.

हायलाइट्स:
- रामदासभाई तुमची सेकंड ईनिंग जोरदार सुरू करा
- शंभुराज देसाई, उदय सामंत यांनीही भाई सभागृहात परत या असा आग्रह केला होता.
- रामदास कदम यांच्यावर मातोश्रीच खप्पामर्जी
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील माजी मंत्री रामदासभाई कदम यांचा समावेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून कोकणातील आपला शिवसेनेचा गट अधिक भक्कम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवश्यक ते बळ दिले जात आहे. यापूर्वी मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गेले १२ वर्षे विधानपरिषद सदस्य होते. उद्धव ठाकरे यांच्याकडुन त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नव्हती. याचदरम्यान खेड जामगे येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ‘रामदासभाई तुमची सेकंड ईनिंग जोरदार सुरू करा’, असा सल्ला दिला होता. यावेळी उपस्थित असलेले शंभुराज देसाई, उदय सामंत यांनीही भाई सभागृहात परत या असा आग्रह केला होता.
काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्यावर मातोश्रीच खप्पामर्जी झाली होती. यानंतर अनिल परब यांना बळ देऊन दापोलीत रामदास कदम गटाचे पंख पद्धतशीरपणे छाटण्यात आले होते. रामदास कदम गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांच्या जागी परब यांनी सूर्यकांत दळवी गटाला बळ देत तीन नव्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यामुळे रामदास कदम यांच्या गटाती कार्यकर्ते प्रचंड नाराज होते. अखेर रामदास कदम आणि योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर कोकणात रामदास कदम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येईल, अशी चर्चा होती. रामदास कदम यांनी मध्यंतरी मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे म्हटले होते. मी मंत्रीही नसेन आणि मी विधानपरिषदेतही जाणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, आता रामदास कदम यांना विधानपरिषदेवर पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात काही नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान याच बैठकीत रामदास भाई कदम यांचा समावेश विधानपरिषदेत करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सुधीरजी कालेकर उपजिल्हाप्रमुख, आदेश केणी विधानसभा क्षेत्रप्रमुख, विधानसभा संघटक प्रदिप सुर्वे,तालुका प्रमुख दापोली श्री उन्मेशजी राजे, तालुका प्रमुख मंडणगड प्रताप घोसाळकर,तालुका प्रमुख खेड :. विजय जाधव ,दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पपू रेळेकर, दापोली संघटक प्रकाश कालेकर, मुंबई येथील प्रदिपजी बबनराव जाधव – दापोली तालुका संपर्क प्रमुख,शंकर बार्डे – मंडणगड तालुका संपर्क प्रमुख या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network