कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना; मध्यरात्री माय-लेकीला सर्पदंश; मुलीने सोडले प्राण – snake bite to mother and daughter in karveer taluka 11 year old girl dies while undergoing treatment
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भामटे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विषारी सापाचा दंश झाल्याने पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. संपूर्ण कुटुंब रात्री जेवण करून झोपले असताना सापाने नुपूर ऊर्फ ज्ञानेश्वरी सचिन यादव हिला दंश केला. तसंच तिच्या पाठोपाठ आईलाही सापाचा दंश झाला. सर्पदंश झालेला कळताच दोघींनाही सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्ञानेश्वरीचे वडील सचिन यादव हे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. यादव कुटुंबीय भामटे गावातील देसाई नगरमध्ये वास्तव्यास आहे. रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले आणि झोपेत असतानाच रात्री १ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरीचा हात सापावर पडला. यावेळी सापाने तिच्या हाताला दंश केला. मात्र झोपेत असल्याने तिला समजले नाही. यानंतर सापाने तिला पुन्हा पाठीला दंश केला. त्यानंतर तिने आई नीलमला उठवले. त्यावेळी आईलाही सर्पदंश झाला. वर्ध्यात खळबळ! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण; नंतर धावत्या कारमध्येच बलात्कार
हा प्रकार समजताच दोघींनाही तातडीने कोल्हापूर येथे शासकीय म्हणजेच सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, माय-लेकीवर काल दिवसभर उपचार सुरू होते. उपचारानंतर दोघीही शुद्धीवर आल्या, मात्र संध्याकाळच्या सुमारास उपचार सुरू असताना ज्ञानेश्वरीने प्राण सोडले. आई नीलमवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ज्ञानेश्वरी पाचवी इयत्तेत शिकत होती. तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.