यावेळी आदित्य ठाकरे यांनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारावर सडकून टीका केली. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते तर मुळात यांनी गद्दारी केली नसती आणि आता असे बिचाऱ्यांसारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचे शिंदे गटाचे चॅलेंजही स्वीकारले. मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. शिंदे गटाच्या ४० आमदारांनीही त्यांचा राजीनामा द्यावा. विधानसभा विसर्जित करून संपूर्ण राज्यातच निवडणूक घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
या बंडखोर आमदारांना आम्ही काय कमी दिले होते. कोणताही मुख्यमंत्री सोडणार नाही, अशी खाती त्यांना दिली होती. पण आज हे सर्वजण आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमच्यासमोर उभे आहेत. आम्हाला एकटं पाडण्यासाठी, आमच्यावर टीका करण्यासाठी या बंडखोर आमदारांना गळ्यात काय-काय घालून उभं केले जात आहे. आम्हाला एकटं पाडा, टीका करा, तर मंत्रिपदं मिळतील, असे या बंडखोर आमदारांना सांगितले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंवर काय टीका केली?
भाजप-शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ‘युवराजांची कायमच दिशा चुकली’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठकरुन बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसत आहेत.