सोलापूर : पंढरपूर येथील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू झालं आहे. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरू होती. अशातच अखेर पाटील हे आयकर विभागाच्या निशाण्यावर आले असून त्यांच्याशी संबंधित तब्बल चार कारखान्यांवर एकाच वेळी आयकर विभागाने धाड टाकली आहे.

अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन तो गेल्यावर्षी यशस्वीपणे चालवून दाखवला होता. त्यानंतर पंढरपुरातील एक बड्या कारखान्याची निवडणूक लढवून त्यामध्येही विजय मिळवल्याने अभिजीत पाटील हे पुन्हा चर्चेत आले होते. पाटील यांच्यामागे राष्ट्रवादीतील बड्या घराण्याचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती. आता या धाडसत्रात आयकर विभागाला नेमके काय हाती लागणार आणि काय कारवाई केली जाणार, हे पाहावं लागेल.

एका मंत्रिपदासाठी गद्दारांना कसं उभं राहावं लागतंय, काय अवस्था झालीय, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

अभिजित पाटील कोण आहेत?

अभिजित पाटील हे वाळू ठेकेदार होते. तुकाराम मुंडेंच्या काळात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे त्यांना तीन महिने तुरुंगात राहावं लागलं. बाहेर आल्यानंतर अभिजित पाटलांनी ट्रॅक बदलला. आधी धाराशिव कारखाना, नंतर नांदेड, नाशिकलाही कारखाना चालवायला घेतला. २० वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला. ३५ दिवसांतच सांगोला कारखाना त्यांनी रुळावर आणला. यामुळेच गेल्या २ वर्षांपासून बंद असलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी त्यांना मागील महिन्यात पसंती दाखवली.

दरम्यान, एक कारखाना चालवणंही अनेक नेत्यांना जमत नसल्याचं आपण पाहतो. शेतकऱ्यांची बिलं तशीच अडकून राहतात. पण अभिजित पाटलांनी पाच वर्षात पाच कारखाने चालवायला घेऊन शेतकऱ्यांनाही खूश केलं होतं. मात्र आता आयकर विभागाने धाडी टाकल्याने पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here