shivsena aditya thackeray, आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ; मुनगंटीवार-जयंत पाटीलही भिडले – bjp vs mahavikas aghadi in the legislative assembly over a sentence of shivsena aditya thackeray speech
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही, असं उत्तर बुधवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलं होतं. यावर तीव्र आक्षेप घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी योग्य ती आकडेवारी द्यावी, दिशाभूल करू नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर आजही कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही या दाव्यावर गावित ठाम राहिले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या याच उत्तराने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही संतापले आणि या संतापाच्या भरात आदित्य यांनी वापरलेल्या एका वाक्यावरून सभागृहात मोठा गदारोळही झाला.
‘आदिवासी भागातली परिस्थिती कशी असते, याची आपल्याला लाज वाटायला हवी, राखीव उत्तर होऊनही तेच तेच उत्तर दिलं जातंय, सर्वपक्षीय समिती स्थापन करुन मंत्री तोडगा काढणार आहेत का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मात्र आदित्य यांनी वापरलेल्या लाज या शब्दावर आक्षेप घेत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. पृथ्वीराजबाबा आणि वळसे पाटलांनी माजी सहकाऱ्याला घेरलं, विजयकुमार गावितांवर दोघे तुटून पडले
आदित्य ठाकरेंच्या वाक्यावर तीव्र आक्षेप घेत पित्याबद्दल आपण असं बोलतो का, ते ज्येष्ठ आहेत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवार यांनी केलेल्या या टीकेनंतर आदित्य ठाकरेंची बाजू घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील सरसावले. आदित्यने परिस्थितीबाबत ते भाष्य केलं असून मंत्र्याविषयी ते वक्तव्य नाही, असा युक्तीवाद पाटील यांनी केला.
‘सुधीरभाऊंची भाषणं ऐकून मी प्रेरित झालेलो आहे, मी एवढंच म्हणालो की स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी ही परिस्थिती आहे, त्यात मला सरकारचा दोष द्यायचा नाही, पण नेते म्हणून ती आपल्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, यात मी काय चूक बोललो नाही, मी कुणाकडे बोट दाखवलं नाही, आपण फक्त नेते म्हणून काम करायला हवं,’ असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.