गडचिरोली : धानोरा तालुका मुख्यालयापासून दीड किमी अंतरावर असलेल्या हेटी येथील एका घरातून चक्क चुंगळी व डब्बा भरून पैसे मिळाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. इतके पैसे घरी आलेच कसे अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, हेटी येथील साईनाथ कुमरे याच्याकडे बेहिशेबी रक्कम असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव व सुधाकर देडे यांना माहिती दिली. या संदर्भात पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी हेटी येथील साईनाथ कुमरे ( ५० ) याच्या राहत्या घरात झडती घेतली. भारतीय चलनानुसार ३२ लाख ६४ हजार २१० रूपये बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली. या रक्कमेमध्ये ५०० च्या ४,११६ नोटा, २०० च्या २,५५०, १०० रूपयांच्या ६,२९३, ५० रूपयांच्या १,२४९, २० रूपयांच्या ७३ व १० रूपयांच्या १०० नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कोसळणार, हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव,पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे सूचनेप्रमाणे धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे , पोलीस हवालदार नैताम, पोलीस नाईक बोरकुटे, उसेंडी, पोलीस शिपाई दुगा, कृपाकर, आडे, खोब्रागडे, गोडबोले तसेच राज्य पोलीस राखीव दल गट क्रमांक १० च्या कर्मचाऱ्यांनी केली.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर प्रकरणी अपर आयकर निदेशक नागपूर यांच्याकडे कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही कारवाई पूर्ण होताच ती रक्कम त्यांच्या मिळकतीची आहे की इतर कोणत्या मार्गाने आलेली आहे, हे कळेल. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

क्रूरतेचा कळस! गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या, २ दिवस उलटूनही कुणीच घेतली नाही दखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here